धनंजय मुंडेंच्या गाडीला
अपघात, छातीला मार;
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या
गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. परळीकडे
जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात
झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक
पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा
सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय
मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ
मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक
पोस्टमधून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांचा छोटासा
अपघात झाला, त्यामध्ये त्यांना छातीला दुखापत झाली
आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार
आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे
हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या
बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील
उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं
जाणार आहे.
धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत
अपघातासंदर्भात माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय
मुंडे यांनी लिहिलंय की, मंगळवारी दिवसभर
मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे
परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी
शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने
छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ
मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर
विश्वास ठेवू नये.