कर्नाटक भाजपमुक्त होईल : माजी मंत्री रेणुकाचार्य
बंगळूर : कर्नाटक भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह सुरूच आहे, भाजप नेते, माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांनी राज्य लवकरच भाजपमुक्त होणार असल्याचे मंगळवारी सांगितले.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे विश्वासू रेणुकाचार्य आज शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की येडियुरप्पा यांची पक्षात झालेली उपेक्षा भाजपसाठी शाप ठरली आहे. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्यात आले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. आम्ही कर्नाटकला काँग्रेसमुक्त कर्नाटक बनवू, असे म्हटले होते. मात्र, तीच परिस्थिती आज आपल्या पक्षावर आली आहे, असे म्हणत त्यांनी स्वपक्षीयांवर ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना रेणुकाचार्य म्हणाले की, मी आमच्या मतदारसंघातील योजना जाणून घेण्यासाठी त्यांना भेटलो होतो.
भाजपमध्ये सामाजिक न्यायाची कोणतीही संकल्पना नाही, असा आरोप करून माजी मंत्री म्हणाले की, पक्षावर दूरच्या ठिकाणाहून कोणाचे तरी नियंत्रण आहे. असेच सुरू राहिल्यास पक्षाचा नायनाट होईल, असे ते म्हणाले. भाजपचे नेते भ्रमात जगत असून त्यांनी आधी यातून बाहेर यावे. प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपला असला तरी अद्याप प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही. विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे मन यामुळे खूप दुःखी आहे. काही प्रेस रिलीज वाघ आहेत. माझा पक्ष मला आई समान आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. काही नेत्यांच्या कृत्याने माझे मन दुखावले असून त्याचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले.
रेणुकाचार्य मोठे होतात म्हणून कांहीजणांनी पाय ओढण्याचे काम केले. मी बोलताच रेणुकाचार्य पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या ते पसरवत आहेत. जे राजकीयदृष्ट्या वाढतात ते कापले जातात. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नसल्याबद्दल रेणुकाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली.