भारताची ऐतिहासिक भरारी; चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं
श्रीहरिकोटा:
इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण ‘केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान- 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस f लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.
चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्युलचं वास्तविक वजन 448.62 किलो आहे.