सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
बेंगळुरू :
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रात उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती सांगितली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारणा/कोयना जलाशयातून २ टीएमसी तर उजनी जलाशयातून 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला पत्राद्वारे केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रात म्हटले आहे की, उत्तर कर्नाटकातील बेळगावी, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, याडगिरी आणि रायचूर या जिल्ह्यांना तीव्र उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. या भागातील मनुष्य आणि पशुधनाची समस्या लक्षात घेत, वारणा/कोयना जलाशयातून कृष्णा नदीत २ टीएमसी तर उजनी जलाशयातून भीमा नदीत ३ टीएमसी पाणी सोडण्याचे तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.