हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव :
हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात गुरुवारी सकाळी कन्नडसक्ती विरो धीआंदोलनातील नऊ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
सीमा भागातील कन्नड सक्ती हटावी यासाठी 1 जून 1986 रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. या आंदोलनात मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नऊ जणांना बलिदान द्यावे लागले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला, तरी नव्या दमाने उभारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यापुढेही रस्त्यावरची लढाई सुरूच राहील, असा निर्धार करण्यात आला. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लागावी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, शुभम शेळके, जिल्हा पंचायत माजी सदस्य सरस्वती पाटील, सुधीर चव्हाण, एम. जी. पाटील, मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी, बेळगाव तालुका समितीचे पदाधिकारी, युवा समितीचे पदाधिकारी, येळ्ळूर विभाग समितीचे पदाधिकारी तसेच समिती कार्यकर्ते उपस्थित होते.