राष्ट्रभक्तीवर आधारित भाजपला निवडून देण्याचा संकल्प करा,अमित शहा यांचे आवाहन
बेळगाव :
काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष परिवार वादावर आधारलेले आहेत. या उलट राष्ट्रभक्तीवर आधारित भारतीय जनता पक्ष केवळ जनतेच्या हितासाठी काम करत आहे. याचा गंभीरपणे विचार करून, जनतेने परिवारवादी पक्षांच्या मागे न लागता भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त करावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प यात्रा सभेत बोलताना केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम. के.हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प यात्रेत पुढे बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस आणि जेडीएस पक्षांवर कडाडून टीका केली. काँग्रेस पक्षाने राज्याला भ्रष्टाचाराच्या दलदलीत नेले, तर जेडीएस वीस-पंचवीस जागांच्या आधारे स्वतःच्या परिवारातील सदस्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठीच धडपड करत असतो.
काँग्रेस-जेडीएस पक्ष परिवारा वादावर आधारित आहेत. त्यांना जनतेच्या हिताची कोणतीच तमा नाही.या उलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकार देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करत आहे. भारत जगात पाचवी आर्थिक महासत्ता बनला आहे.
राज्यातील जनतेसाठी विद्यमान भाजप सरकारने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना अंमलबजावणी केली. उत्तर कर्नाटकाच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी या भागातून धारवाड-कित्तूर रेल्वे मार्ग बनविला जात आहे. कित्तूर परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण होणार आहे. याभागा अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील काळात या भागातील जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प योजना मार्गी लागणार आहेत. याची जाणीव ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.