अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ.
बेळगाव प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे . शनिवारी झालेल्या विविध कार्यक्रमांना अमित शहा यांनी उपस्थिती लावली आणि भाजपच्या आगामी काळातील निवडणुकीसाठी प्रचाराचा अघोषित शुभारंभ केला.
या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे प्रामुख्याने बेळगाव ग्रामीण बैलहंगल आणि खानापूर या मतदारसंघासाठी अमित शहा यांची सभा विशेष बळ देणारी ठरेल असा विश्वास भाजप वर्तुळातून व्यक्त होऊ लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हुबळी येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वागत केले .
त्यानंतर हुबळी येथील विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला .त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील एम .के. हुबळी येथे जाहीर सभा घेतली. त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून आगामी रणनीतीवर मार्गदर्शन केले असल्याचे पक्षातील काही नेत्यांनी सांगितले.
हुबळी येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, हुबळीच्या अमृत महोत्सव सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली.यावेळी बोलताना शहा म्हणाले, गेल्या 75 वर्षांत, संस्थेने तंत्रज्ञान शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. येथील हुशार विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देशाचे नवीन शैक्षणिक धोरण हे संरचित पध्दतीने वाचनासोबतच खेळांवर भर देणारा सर्वसमावेशक बदल आहे असेही त्यांनी सांगितले.