बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान,चाकू हल्ल्यात गंभीर जखमी
मुंबई –
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम) येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास घडली. सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला व त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ यांना सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. सध्या न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून बान्द्रा पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.