अबब !!! सिंगल लेआऊट मध्ये 10 बंगले….
बेळगाव :
मंडोळी रोडवरील गोडसेवाडी येथे ३,६४२ चौरस मीटर जागेत सिंगल ले-आऊट मंजूर करून घेऊन त्याच जागेत दहा बंगले बांधण्यात आल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे महापालिकेचे सात कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार विधानसभेत दाखल झाली आहे.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी हा विषय उपस्थित केला आहे.त्या जागेला महापालिकेकडून आधी एकच पीआयडी दिला होता. पण नंतर त्याच जागेत दहाहून अधिक पीआयडी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद उपस्थित केलेल्या या प्रश्नाची गंभीर दखल नगरविकास खात्याने घेतली असून याप्रकरणी सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. या प्रकरणी महापालिकेचे
निरीक्षक व बिल कलेक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंडोळी रोडवरील गोडसेवाडी येथे हा प्रकार घडला आहे. आमदार पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत
ज्या जागेत हा प्रकार घडला आहे, त्या जागेचा सीटीएस क्रमांकही नमूद केला आहे. आमदारांनी विधानसभेत एखादा प्रश्न उपस्थित केला की, त्याची माहिती संबंधित विभागाकडून मागवून घेतली जाते. आमदार पाटील यांनी हा गोडसेवाडी येथील बंगल्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्याबाबतची लेखी सूचना महापालिकेला केली आहे. महापालिकेकडून याबाबतची सविस्तर माहिती पाठविली आहे. त्या जागेत आधी एक पीआयडी कोणी
मंजूर केला. त्यानंतर त्याच जागेत दहाहून अधिक पीआयडी कोणी मंजूर केले, याची सविस्तर माहिती महापालिकेकडून पाठविली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकाने तेथे बंगले बांधले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याचा परवाना रद्द केला जावा, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे. या प्रकरणात बोगस कागदपत्रे तयार केल्याचा ठपकाही ठेवला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कार्यकाळात पीआयडी देण्यात आले
ते महसूल उपायुक्त व महसूल निरीक्षक महापालिकेतून बदली होऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार? कारवाईचे स्वरूप कसे असणार? याबाबत उत्सुकता आहे.
नियमानुसार सिंगल ले-आऊट मंजूर करून घेतल्यास त्या जागेत एकच बांधकाम करता येते. गोडसेवाडी येथील जागेत बुडाकडून सिंगल ले-आऊट मंजूर करून घेण्यात आले आहे. त्या जागेत एकच बांधकाम केले जाणे आवश्यक होते. पण तसे न करता तेथे दहा बंगले बांधल्याचे तक्रारीत नमूद आहे.