नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली :
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. तिसऱ्यांदाधमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेसंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञाताने गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करीत धमकी दिल्याचे कळतेय. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. सातत्याने धमकी मिळत असल्याने गडकरींना नेमका कुणाकडून धोका आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अद्याप धमकी देणाऱ्याची माहिती मिळाली नसून गांभीर्याने तपास सुरु असून लवकरच आरोपीला अटक करू, अशी माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी गडकरींना दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. १४ जानेवारीला नागपूर येथील कार्यालयात त्यांना पहिल्यांदा धमकीचा फोन आला होता.जयेश पुजारी या गुंडाने त्यांना फोन करीत १०० कोटींची मागणी केली होती. तर, २१ मार्चला गडकरींना दुसऱ्यांदाधमकी मिळाली होती. यावेळी फोन करणाऱ्याने १० कोटींची खंडणी मागितली होती.
दरम्यान, गडकरींना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. पुजारीला बेळगाव कारागृहातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. पीएफआय, लष्कर-ए-तैयब्बा, दाउद इब्राहिमच्या टोळीसोबत संबंध असलेला पुजारीअटकेत असताना गडकरींना पुन्हा धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.