विधानसभा नंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी
मुंबई प्रतिनिधी
देशाची आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. देशभरातले जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झल्या आहेत. सत्ताधारी भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकजूट तयार करत आहेत. राज्यातही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर आव्हान निर्माण केलं आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. आगामी रणनीती, महाविकास आघाडीच्या सभा आणि जागावाटपाबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे अनेक मोठे उपस्थित होते.