शिंदे सरकारला ‘सर्वोच्च’दिलासा : ‘अपात्रते’चा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या ‘कोर्टात’
नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने 10 प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून लांबणार असल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं वाचन केलं. यावेळी पाचही न्यायाधीश कोर्टात उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. पक्षात फूट पडली हे अध्यक्षांना 3 जुलै रोजी कळलं होतं. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, असंही कोर्टाने म्हटलं आहे.