दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे ऊस तोडण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या दाम्पत्याच्या क्षुल्लक भांडणातून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील उप्परट्टी गावात घडली.
मीराबाई जंगले (30) असे मृत पत्नीचे नाव असून बालाजी जंगले (40) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. महाराष्ट्रातील चांबुरदर गावातील बालाजी आणि मीरा दाम्पत्य बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील उप्परट्टी गावात ऊस तोडणी टोळी समवेत ऊस तोडण्यासाठी आले आहेत. पती बालाजी दारूच्या नशेत काम करायचा. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. भांडण वाढत जाऊन बालाजीने पत्नीच्या डोक्यात दगडाने वार केले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गोकाक पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तपास केला.