बेळगाव महानगरपालिकेची प्रभाग संख्या वाढणार: सतीश जरकिहोळी
बेळगाव :
बेळगाव महानगरपालिकेची प्रभाग संख्या 58 वरून 90 पर्यंत वाढविण्याची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. शहरालगत असणाऱ्या 8 ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर प्रभाग संख्या वाढविली जाणार आहे. बृहन्बंगळूर महापालिकेच्या धर्तीवर बृहन् बेळगाव महापालिका स्थापन करण्याची ही योजना असल्याचे सूत्रांकडून समजते.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या संदर्भात बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. यामुळे बंगळूर शहराप्रमाणेच बेळगावलाही वाढीव निधी मिळेल, असे जारकीहोळी यांचे म्हणणे आहे.वस्तुतः गेल्या 30 वर्षांत बेळगाव शहराचा आकार व लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे; पण प्रभागांची संख्या मात्र 58 च आहे.
2006 मध्ये प्रभाग पुनर्रचना झाली, त्यावेळी प्रभाग संख्या वाढविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वाढली नाही. 2018 मध्येही प्रभाग संख्या कायम राहिली आहे. त्यामुळे काही प्रभागातील मतदारांची संख्या जास्त तर काही प्रभागांमध्ये खूपच कमी आहे.
प्रभाग संख्या वाढविल्यानंतर हा असमतोल दूर होऊ शकतो.भविष्यात आठ ग्रामपंचायतींचा महापालिकेत समावेश झाला तर प्रभागांची संख्या वाढवावी लागणार आहे. दर दहा वर्षांनी प्रभाग पुनर्रचना होते, म्हणजे महापालिकेच्या दोन निवडणूक झाल्यानंतर ही प्रक्रिया केली जाते.