अनेक राज्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट
नवी दिल्ली :
देशात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पूराची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू, तर इतर १० जण जखमी झाल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली.येत्या पाच दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशातील ८०% भूभागावर मान्सून दाखल झाला आहे.
दरम्यान उत्तर भारतातील काही राज्यांसह गुजरात, राजस्थान आणि पंजाब मधील काही भागात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. येत्या दोन दिवसांमध्ये या भागात मान्सूनच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
आयएमडीने २० राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.