विधानसभा निवडणूक उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्च मर्यादा
बेळगाव :
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्वच इच्छुक आणि उमेदवारांना धावपळ करावी लागत आहे. निवडणुकीतील खर्च म्हणजे अनेकांच्या दृष्टीने आगामी काळातील पेरणी असते. पण,वारेमाप खर्चावर निवडणूक आयोगाने मर्यादा आणली असून संपूर्ण निवडणुकीत उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंतच खर्च करावा लागणार आहे.त्यामुळे जाहीर कार्यक्रमांत जरा हात आवरता घेऊनच प्रचार करावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला किती खर्च होत असेल, असा विचार केला तरी कोटीच्या कोटी उड्डाणे डोळ्यासमोर येतात. बहुतांशी जण मतदान खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि अनेक ठिकाणी मतदारांनाही त्याचे काही वाटत नाही. पण, या साऱ्या प्रकारांवर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे. गतवेळी एका उमेदवाराला निवडणुकीसाठी २८ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती.