आ. अभय पाटील यांच्या हस्ते 12 कोटींच्या विविध विकास कामांना चालना
बेळगाव : प्रतिनिधी
शहर आणि परिसरातील नागरिकांना विविध स्वरूपातील नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांची त्वरित सोडवणूक करण्यासाठी आता विकास कामांना चालना देण्यात आली आहे. गुरुवारपासून बेळगाव दक्षिण विभागातील 29 ठिकाणी विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
आ. अभय पाटील यांनी या विकासकामांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी नाश्ते पे चर्चा या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी काही कामांची मागणी केली होती. त्याची दखल घेवून ही कामे सुरू झाली आहेत. सुमारे 12 कोटी रुपयांच्या खर्चाची ही कामे आहेत. सदर कामांची पूर्तता येणाऱ्या 30 ते 40 दिवसात करण्यासाठी सूचना करण्यात आल्या असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.
यामध्ये शहराच्या महाद्वार रोड, गेंजीमळा, कपिलेश्वर कॉलनी येथील नवीन आरसीसी ड्रेनेज पाईपलाईन आणि गटार निर्मितीची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच शास्त्रीनगरमधील विविध विभागात रस्ते सुधारणा कामे सुरू झाली आहेत.
शहापूरमधील आचार्य गल्ली येथे पेव्हर्स बसविणे, ओमनगर येथील रस्त्याची सुधारणा, टीचर्स कॉलनी येथील रस्त्यांची सुधारणा करण्याची कामे देखील सुरू झाली आहेत. खासबाग येथील कन्नड शाळा क्रमांक 3 मध्ये दुरूस्ती काम हाती घेण्यात आले आहे. खासबाग, वडगाव, देवांगनगर येथील कामांचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला.