कर्नाटक – महाराष्ट्र सीमारेषेवर
पोलीस छावणीचे स्वरूप
बेळगाव:
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर
असणाऱ्या दूधगंगा नदीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा रेषेवर
बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व
कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोर्चाला जाणार या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यामुळे कोगनोळी टोल नाका ते दूधगंगा नदी परिसराला
पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सकाळी सात वाजल्यापासून कर्नाटक पोलिसांनी
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या चार चाकी वाहनांची
तपासणी सुरू केली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीचे
नेतेमंडळी महाराष्ट्रात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे
स्वागत सीमारेषेवर करण्यात येणार होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व नेते यांचे स्वागत कर्नाटक हद्दीत होता कामा नये या उद्देशाने कर्नाटक पोलीस तैनात करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे
कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी
टोलनाक्यावर आले असता कर्नाटक पोलिसांनी त्यांना
दमदाटी करून पुढे महाराष्ट्रात पाठवून दिले.
यावेळी महाराष्ट्र किंवा समिती व पोलीस यांच्यात शाब्दिक
चकमक झाली.
एकंदरीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मोर्चा
निमित्ताने पुन्हा एकदा कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषेला
पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कर्नाटक पोलिसांच्या वतीने मंडल पोलीस निरीक्षक
संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे
उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह शेकडो पोलीस तर
महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने डीवायएसपी संकेत गोसावी,
कागल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक
वाकचौरे यांच्यासह अन्य शेकडो पोलीस तैनात करण्यात
आले होते.