विश्रामबाग रहिवासी संघटनेतर्फे आ. अभय पाटील आणि नगरसेवक नितीन जाधव यांचा सत्कार
बेळगाव : प्रतिनिधी
शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील विश्रामबाग रहिवासी संघटनेतर्फे बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील आणि वॉर्ड क्र. 29 चे नगरसेवक नितीन जाधव यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
या विभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी विविध स्वरूपातील विकासकामे पूर्ण करून घेण्यात आली आहेत.
यानिमित्ताने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील विश्रामबाग रहिवासी संघटनेतर्फे नारायण हंगिरगेकर, नारायण अनगोळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर शाल, श्रीफळ देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आ. अभय पाटील यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपण कोणत्याही वेळी सज्ज राहू, अशी ग्वाही दिली. नगरसेवक नितीन जाधव यांनी देखील सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम संयोजनासाठी राजू होन्नोळी, चंद्रकांत कांबळे, नंदन कुलकर्णी आदींसह इतर सदस्यांनी पुढाकार घेतला होता.