केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ‘यांची’ चमकदार कामगिरी
बेळगाव:
बेळगाव शहरातील आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवताना 4 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदके पटकावण्याद्वारे बेंगलोर रिजनला स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
नवी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे झालेल्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या कु. चिन्मय बागेवाडी (केंद्रीय विद्यालय -2) याने 19 वर्षाखालील मुलांच्या गटातील 50 मी. फ्रीस्टाइल व 50 मी. बॅकस्ट्रोक मध्ये 2 सुवर्ण पदके तसेच 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये रौप्य पदक संपादन केले. कु. आदी शिरसाठ (केंद्रीय विद्यालय -3) याने 17 वर्षाखालील गटातील 400 मी. वैयक्तिक मिडले मध्ये रौप्य तर 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कांस्य पदक मिळवले. कु. वैजनाथ सोनपणावर (केंद्रीय विद्यालय -2) यांने 4×100 मी. मिडले रिले व 4×100 मी. फ्रीस्टाइल रिले मध्ये 1 सुवर्ण व 1 रौप्य पदक संपादन केले. कु. अर्णव कुलकर्णी (केंद्रीय विद्यालय -2) याने 17 वर्षाखालील गटात डायव्हिंगच्या 1 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये सुवर्ण व 3 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये रौप्य पदक पटकावले. कु. मयुरेश जाधव व कु. प्राची कदम (केंद्रीय विद्यालय -2) यांनीही राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी केली.
सदर यशस्वी जलतरणपटूंपैकी चिन्मय बागेवाडी, आदी शिरसाठ व अर्णव कुलकर्णी यांची नोव्हेंबर महिन्यात राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्कूल गेम्स एसजीएफआयसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. उपरोक्त सर्व जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते व रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन, तसेच आबा क्लबचे चेअरमन मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते व अरविंद संगोळ्ळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.