20 ऑगस्ट रोजी बेळगावमध्ये ‘गृहलक्ष्मी’चा शुभारंभ
बेळगाव :
कर्नाटक राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा बेळगावमध्ये शुभारंभ होणार आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा 20 ऑगस्ट रोजी शुभारंभ केला जाणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. राज्यात आतापर्यंत 76 टक्के महिलांनी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. 19 जुलै रोजी या योजनेच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामीण भागात 80 टक्के तर शहरी भागात 69 टक्के महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली
राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी सदर योजना लागू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, योजनेला तीन दिवस विलंब होत आहे.
20 ऑगस्ट रोजी प्रत्येक खेडे, तालुका, जिल्हा पंचायत महानगरपालिकेच्या वॉर्ड पातळीवर गृहलक्ष्मीच्या लाभार्थीना एकत्र आणून आनंदोत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. कोटी 28 लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
बेळगावमध्ये गृहलक्ष्मी योजनेचे लोकार्पण होणार असून पंचायत पातळीवरही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. बेंगळूरमध्ये 198 ते 200 ठिकाणी गृहलक्ष्मी लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.