सावगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. आताचे तरुण मोबाइल मिळविण्यासाठी खूप हट्ट करतात आणि ते न मिळाल्यास मनात रागही धरत नैराश्यातही जातात. ‘एकटे एकटे वाटते, मरावे का? याचं कारण काय माहीत नाही, पण जगून काहीच फायदा नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सावगाव (ता. बेळगाव) येथे घडली. एवढे मोठे पाऊल उचलल्याने गावातील लोकांना धक्का बसला आहे.
दीपक भरमा पाटील (वय 17, रा. सावगाव) असे त्याचे नाव असून, घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, दीपक हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून, डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो कॉलेजल गेला होता. सायंकाळी घरी परतल्यानंत 5.30 च्या दरम्यान त्याने बेडरूममध्ये जावून अचानक गळफास घेतला. ही घटना काही वेळानंतर कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दीपकने किमती मोबाईलची मागण केली होती. मात्र, कुटुंबीयांनी त्याला कमी किमतीचा मोबाईल दिल्याने गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक अस्वस्थ बनला होता. त्यातून त्याने आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
खरे तर आजची तरुणाई पूर्णपणे मोबाईलच्या प्रेमात आहे असे म्हणायला हरकत नाही. पण असे होणार असेल तर मोबाईलचा वापर- गैरवापर आणि गरज याबाबत मुलांना सांगणे आवश्यक आहे. मोबाईल काय आणि कधी वापरायचा ते आतापासून त्यांना शिकवावं लागेल. मुलांना मोबाईल देण्याच्या आश्वासनाऐवजी तो आत्ता विकत का घेऊ नये हे सांगितल्यास कदाचित असे प्रकार होणे टळतील.