भीषण अपघातात 6 जण ठार झाले. तर 25 जण गंभीर जखमी
मलकापूर (बुलढाणा) :
अमरनाथहून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरीला विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या लक्झरीने जोरदार धडक दिली. त्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 6 जण ठार झाले. तर 25 जण गंभीर जखमी झाले. यातील अत्यवस्थ 5 जणांना बुलढाणा (महाराष्ट्र) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग 6 वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हिंगोली येथील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्सरी बस क्र. एम.एच. 08/9458 ही अमरनाथहून 40 प्रवाशांना घेऊन परतीच्या वाटेवर होती. आज शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या क्र. एम. एच. 27 बी. एक्स. 4466 या बसने समोरच्या बसला चालकाच्या बाजूने चिरत पुढे गेली. त्यामुळे समोरासमोर आलेल्या दोन्ही लक्झरी बसेसमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हिंगोलीला परतीच्या वाटेवर असलेले 5 प्रवासी जागीच ठार झाले. तर 25 जण गंभीर जखमी झाले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम झाला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
या घटनेत गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने शर्थीचे उपचार केले. मात्र 25 जणांपैकी 5 जण डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने अत्यवस्थ झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामीण पोलीस निरीक्षक फरहात मिर्झा आदींच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अन् नागरीकांच्या संयुक्त प्रयत्नाने गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
मलकापूर नजीकच्या महामार्गावरील अपघाताची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे तत्काळ दाखल झाले. त्यांनी आज शनिवारी पहाटे 5.30 वाजता घटनास्थळाची पाहणी करून उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींची भेट घेत त्यांची जा विचारपूस केली. पोलिस प्रशासनाच्या वतीने जखमींना आवश्यक त्या मदतीसाठी आश्वस्त करण्यात आले आहे