बेळगाव :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या शनिवार दि. 6 मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध ठिकाणी प्रचार सभा होण्याबरोबरच रायबाग आणि बेळगाव उत्तर मतदार संघ अशा दोन ठिकाणी त्यांचा ‘रोड शो’ होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेळगाव जिल्ह्यातील उद्या शनिवार दि. 6 मे रोजीच्या प्रचार दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे असणार आहे. सौंदत्ती यल्लमा विधानसभा मतदारसंघातील सौंदत्ती तालुका क्रीडांगणावर सकाळी 11:30 वाजता जाहीर सभा. त्यानंतर अथणी विधानसभा संघातील भोजराज मैदान, जी. ए. कॉलेज अथणी (ता. चिक्कोडी) येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा.
अथणी येथील सभा आटोपल्यानंतर दुपारी 2:30 वाजता रायबाग मतदार संघात रायबाग (ता. चिक्कोडी) येथील आंबेडकर सर्कल ते डिग्गेवाडी पर्यंतच्या ‘रोड शो’ मध्ये सहभाग. त्यानंतर चिक्कोडी -सदलगा मतदार संघातील आर. डी. स्कूल मैदानावर दुपारी 3:30 वाजता जाहीर सभा.
त्याचप्रमाणे त्यानंतर यमकनमर्डी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा. शेवटी दिवस अखेर म्हणजे सायंकाळी 6:30 वाजता बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये ‘रोड शो’.