बेळगाव :
बेळगाव व उपनगरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आज (शनिवार) सकाळी बेळगावला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी खणगाव गावातील मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अचानक फुटली. यामध्ये 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडून आजूबाजूच्या शिवारामध्ये पाणीच पाणी झाले.
उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती L&T कंपनीने दिली आहे. त्यामुळे पुन्हा बेळगावमध्ये पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते, अशा वेळी हिडकलहून बेळगावला येणारी मुख्य जलवाहिनी खणगाव गावातील मुख्य रस्त्यावर अचानक फुटली.
यामध्ये हजारो गॅलन पाणी गळतीत वाया गेले. ही मुख्य जलवाहिनी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फुटली. त्यावेळी 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. हे पाहून गावातील ग्रामस्थ घाबरून गेले. यामुळे गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
यामुळे या परिसरातील रस्ता उखडून रस्त्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे जमिनीतील दगडही लांबवर रस्त्यावर पडल्याचे दिसून येत होते. दरम्यान पाण्याचा उंच उडणारा फवारा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.