आ. अभय पाटील यांनी मांडला ईएसआय हॉस्पिटलबाबत प्रश्न
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव दक्षिण विभागाच्या कार्यक्षेत्रात ईएसआय हॉस्पिटलची निर्मिती व्हावी आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केली आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा मांडला. तसेच कामगार खात्याने याबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत आग्रही मागणी केली. यापूर्वी सदर हॉस्पिटल दक्षिण विभागात निर्माण करण्यासाठी ईएसआय विभागाने पाच एकर जागेची निश्चिती देखील केली होती.
त्यासाठी पाहणी करण्यात आली होती. सध्या असलेले हॉस्पिटल हे कामगारांच्या वसाहतीपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आपण मागील दोन वर्षे या मुद्याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
आता या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा जागेचे परिक्षण करून योग्य निर्णय घेतला जावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर राज्याचे कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांनी उत्तर देवून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच केंद्र सरकारकडून योग्य जागेसाठी पर्याय निवडण्यात येईल, असे सांगितले.