कंग्राळी खुर्दमध्ये भरदिवसा घरफोडी
बेळगाव : भरदिवसा ₹ 2 लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना बुधवारी कंग्राळी खुर्दमध्ये उघडकीस आली. साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 70 ग्रॅम चांदी असा सुमारे 1 लाख 84 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. दुपारी 12.20 ते 12.45 या अवघ्या 25 मिनिटांत ही घरफोडी झाली. या प्रकरणी पाटील गल्लीतील रघुनाथ ऊर्फ बाळू टोपात्रा पाटील यांनी एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या शेती हंगाम सुरु असल्याने पाटील कुटुंबीय शेताकडे गेले होते. त्यांचा मुलगा योगेश हा 12.20 च्या सुमारास कॉलेजला गेला. परंतु तो सायंकाळी घरी आला. यावेळी घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यातील झुमके, गंठण, चार जोड पैंजण चोरून नेले. यातील सोन्याचे दागिने साडेचार तोळ्यांचे तर चांदीचे सात तोळ्याचे आहेत.
या घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना देण्यात आली. f पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरी झालेल्या घराशेजारी व काही अंतरावरील एका घरासमोर सीसीटीव्ही आहेत. यामध्ये दोन संशयास्पद युवकांची छबी दिसते. परंतु, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. परंतु, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे शोध घेणे सुरु आहे.