सावगाव रोडवर झालेल्या अपघातातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
बेळगाव, :
सावगाव रोडवरील अंगडी महाविद्यालयासमोरील मार्गावर अशास्त्रीय पद्धतीने घालण्यात आलेल्या गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेल्या बुधवार पेठ, टिळकवाडी येथील 27 वर्षीय तरुणाचा खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी असे त्या युवकाचे नाव असून तो अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होता. बुधवार दिनांक 12 जुलै रोजी तो आपल्या दुचाकीवरून कॉलेजला जाताना त्या गतिरोधकामुळे दुचाकीवरून तो पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
बेळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक घातले गेले आहेत. यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. अनावधानाने अशा गतिरोधकावरून वाहन चालविताना वाहन चालकाचा हात, हँडलच्या मुठीवरून सुटला की अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन, आणखीन एखाद्याचा बळी जाण्याआधी संबंधित विभागाने शहर परिसरातील असे अशास्त्रीय पद्धतीने घातलेले गतिरोधक काढून सुरळीत गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.