हेडा बंधूं विरुद्ध एफआयआर , राधेश्याम हेडा फरार….
बेळगाव :
सरकारी कंत्राट मिळविण्यासाठी चक्क जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून पूर्णत्व प्रमाणपत्रे (कम्प्लिशन सर्टिफिकेट) तयार केल्याचा गुन्हा शहरातील हेडा बंधूंवर दाखल झाला आहे.
जिल्हा प्रशासनानेच त्यांच्याविरोधात मार्केट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.आनंद श्रीवल्लभ हेडा व राधेश्याम श्रीवल्लभ हेडा (दोघेही रा.बेळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
या दोघांवर भारतीय दंडविधान कलम ४२०, ४१७, ४६५, ४६८, ४७१, ४७४ व १२० बी, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक, फसवण्याच्या उद्देशाने बनावट सरकारी कागदपत्रे तयार करणे, कट रचून गुन्हा करणे असे ठपके हेडा बंधूंवर आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या
एफआयआरमधील तपशीलानुसार कामांची कंत्राटे आनंद हेडा राधेश्याम हेडा या दोघा सख्ख्या भावांनी भागीदारीत मे. ए. आर.कन्स्ट्रक्शन्स नावाची कंपनी सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून ते सरकारी कंत्राटे मिळवत होते.
यामध्ये प्रामुख्याने नवीन रस्ते निर्मिती, रस्ते दुरुस्ती, गटार निर्मिती तसेच झाडे कापण्याची निविदा भरून त्याद्वारे ते कंत्राट मिळवत होते. हे कंत्राट पटकन मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची प्रमाणपत्रे जोडली जात होती.
चार वर्षांपूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून एस. बी.बोम्मनहळी कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात १५-८-२०१८ ते १३-११-२०२० या काळात रस्ते, गटारी व झाडे तोडण्याचे कंत्राट ए. आर.कन्स्ट्रक्शनने व्यवस्थितरित्या केले आहे, शिवाय ऑफिस फर्निचर पुरवठा व्यवस्थित केला आहे, अशा आशयाची दोन प्रमाणपत्रे या बंधूंनी तयार करून घेतली. ती अर्थातच बनावट होती.
ही बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्यांनी काही ठिकाणी पुढची कंत्राटे मिळवण्यासाठी निविदा भरल्या. हेडा बंधूंनी फक्त बेळगावातच नव्हे, तर आसाम, महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये अशी बनावट प्रमाणपत्रे जोडून निविदा भरत कंत्राटे मिळविली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश होणार का,याबाबत उत्सुकता आहे.
आनंद हेडा व राधेश्याम हेडा या बंधूंवर दाखल केलेल्या ८ कलमांपैकी अनेक कलमे ही अजामीनपात्र आहेत. त्यांच्याविरोधात एफआयआर शनिवारी २४ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे. परंतु, मार्केट पोलिसांनी अधिवेशनाचे कारण देत अद्याप अटक केलेली नाही.