आमदारांच्या साक्षीने मराठा आरक्षणासाठी
विधानसभा अध्यक्षांना
कर्नाटक क्षत्रिय मराठा
फेडरेशनच्या वतीने निवेदन
बेळगाव :
कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने
हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर
“चलो सुवर्णसौध”ची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने आज सोमवारी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ कागेरी हेगडे यांना निवेदन देण्यात आले.
आज सकाळी कर्नाटक मराठा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावच्या सर्किट हाऊस येथे विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ कागेरी हेगडे यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणा संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात माहिती देताना फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर कडोलकर म्हणाले, बेळगाव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने पुढील सोमवारी दि. 20 डिसेंबर रोजी सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला अलीकडे विविध आश्वासने दिली आहेत.त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समुदायाला सध्या इतर मागास वर्ग ३ ब असे आरक्षण आहे.मात्र त्यांचा इतर मागास वर्ग २ ए मध्ये समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी मराठा फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.आरक्षणामुळे मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती होणार असल्याचेही कडोलकर यांनी सांगितले.
आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, धनंजय जाधव, आनंदराव घोरपडे, गणपत पाटील, बंडू कुद्रेमणीकर, रमेश ताशिलदार, मनोहर बांडगी, नागेश देसाई व अन्य सदस्य उपस्थित होते.