जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घेतली टास्क फोर्सची बैठक,
बेळगाव : पावसाळा लांबल्याने जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व तहसीलदारांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेऊन कोणती पावले उचलावीत व आवश्यक अनुदान याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
लोक आणि पशुधनांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत आज सोमवारी (19 जून) अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. संबंधित तालुक्याच्या किंवा मतदारसंघातील समस्येची छाननी करण्यासाठी आणि आपत्कालीन कामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक घेण्यात यावी. त्यावर आधारित वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
उपलब्ध निधीत आमदारांच्या सल्ल्यानुसार कामे सुरू करावीत. लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तातडीची कामे करण्यासाठी ग्रामीण पेयजल पुरवठा विभागात पुरेसे अनुदान उपलब्ध आहे.
जिल्ह्य़ात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्व तहसीलदार व स्थानिक संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींमध्ये अनुदान उपलब्ध असून, खासगी कूपनलिका उपलब्ध असल्यास ते तात्काळ भाड्याने घ्यावेत, असेही ते म्हणाले.