काँग्रेसची भेटवस्तु आणि नारळावर शप्पथ घेण्याची राजकारण…….
बेळगाव : प्रतिनिधी
येणाऱ्या काही दिवसात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे आतापासूनच बेळगाव तालुका परिसरात सर्वत्र हालचाली गतिमान झाल्या आहेत.
यामध्ये राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसली आहे. यासाठी अनेक मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
यातच आता भावी मतदारांना रांगोळी स्पर्धेचे निमित्त पुढे करून आमिषे दाखविण्याचा प्रकार देखील चांगलाच चर्चेत आला आहे. ग्रामीण मतदार संघात कुकरची शिट्टी वाजविण्यासाठी टपलेले राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.
मात्र, नारळावर हक्क ठेवून तुम्हालाच मतदान करणार असल्याची शपथ घेण्याची सक्ती देखील सुरू झाल्याने हा प्रयोग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विशेष म्हणजे असे करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून काही ग्रामस्थांनी या प्रकाराला आक्षेप घेतला आहे.
एकीकडे आकर्षक भेटवस्तू देवून मतदारांना खरेदी करण्याचे कारस्थान सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना शपथेने बांधून आपल्या जाळ््यात अडकविण्याचे कारस्थान रचले जात आहे. अशा प्रकारांना सूज्ञ मतदार बळी पडणार नाहीत, असा इशारा एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सध्या तालुक्यात व्हायरल झालेल्या या व्हिडिओने वातावरण ढवळून काढले आहे.