शिवसेनेत दोन गट पाडणे, हे
भाजपचेच मिशन; गिरीश
महाजनांनी दिली कबुली
मुंबई :
शिवसेनेत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही
कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर दोन
गट तयार झाले. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट
एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र
गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी
सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं.
भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीचं सरकार. अशातच
ठाकरे गटाकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप
वारंवार केला जात होता. अशातच आता याची कबुलीच
भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं दिली आहे. यामुळे
अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात
चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. हे
गुपित मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातीव एका सभेत
बोलताना सांगून टाकलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या सभेला
मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. जळगाव
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल
भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन
बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा
भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ शिंदे कसे
मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही
विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं.
एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता
त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच.
सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा
मातेचाही आशीर्वाद होताच. हे सर्व मिशन एवढं सोपं
नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात,
उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा
लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल
गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर
काय करायचं? असं वाटायचं. मात्र पुढारी कसे असतात,
तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती
आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.