अमेरिकेत पुन्हा गोळीबार ; 6 वर्षाच्या
चिमुकल्याचा शिक्षिकेवर गोळीबार
विदेश
व्हर्जिनिया: अमेरिकेतील घातक बंदूक संस्कृतीला आणखी
एक निष्पाप जीव बळी पडला आहे. यावेळी मात्र बंदूक
चालवणारे हात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका
विद्यार्थ्यांचे होते. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही
धक्कादायक घटना घडली. या घटनेनं पुन्हा एकदा
जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका
पुन्हा एकदा हादरली आहे.
शुक्रवारी अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक
शाळेत विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबारात एक शिक्षिका
गंभीर जखमी झाली. तात्काळ शिक्षिकेला रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू
आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
मिळतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षिकेची प्रकृती गंभीर
असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी अद्याप या
प्रकरणी सविस्तर माहिती दिली नसली, तरी
व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत
ही घटना घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या गोळीबारात एकही विद्यार्थी जखमी झालेला
नाही.
व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी माध्यमांशी
बोलताना सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणी एका
विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्याचं वय किती
आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलं नसलं तरी मीडिया
रिपोर्ट्समध्ये, गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा
असल्याचं सांगण्यात आलं आहे. न्यूपोर्टचे पोलीस प्रमुख
स्टीव्ह डू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या
सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात कॉलवर माहिती
मिळाली. माहिती मिळताच आमचं पथक घटनास्थळी
पोहोचलं.