आ. अनिल बेनके ट्रॉफी टेनिस
बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव :
बेळगावातील सरदार्स हायस्कूल मैदानावर टेनिस
बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी, अशी मागणी गेल्या चार
वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार
अनिल बेनके यांनी सांगितले.
शहरातील सरदार्स मैदानावर आज शुक्रवारी अखिल
भारतीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत
होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. मंगल अंगडी, डीसीपी
रवींद्र गडादी, आदी मान्यवर उपस्थित होते. खा. मंगल अंगडी
यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
करण्यात आले.
पुढे बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, मुंबई आणि
बंगळुरूमध्ये खेळणारे अनेक क्रिकेटपटू सरदार्स मैदानात
खेळण्याची इच्छा व्यक्त करतात. देश-विदेशातील टेनिस
बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळलेले खेळाडू बेळगावच्या सरदार्स
मैदानात खेळण्यास उत्सुक असतात. बेळगावकरांना इथून
पुढे 12 दिवस वेगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे
खेळाडूंनी स्वयंशिस्त पाळावी आणि क्रिकेट प्रेमींनी
शांतपणे क्रिकेट स्पर्धा पाहावी. लोकांना त्रास होणार नाही
याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या,
हा देशातील लोकप्रिय खेळ आहे. खेळणाऱ्यांना आणि
बघणाऱ्यांनाही यातून मोठा आनंद मिळतो. शरीराबरोबरच
मनालाही तंदुरुस्त करणारा हा खेळ आहे, असे सांगून
त्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आ. अनिल बेनके ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट
स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशीचा सामना इलेक्ट्रॉनिक्स
मीडिया आणि फौजी संघादरम्यान खेळविण्यात आला.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला व नंतर सामना पाहण्यासाठी
शेकडो क्रिकेटरसिक उपस्थित होते.
क्रिकेट