आ. अभय पाटील यांच्या पुढाकाराने रंगला आगळा क्रीडामहोत्सव
बेळगाव : प्रतिनिधी
लहान मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शैक्षणिक बदलामुळे सुट्टीतही घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि युवा पिढीला मोबाईल कम्प्युटर आणि सोशल मीडियाचे लागलेले व्यसन यामुळे कुठेतरी जुने पारंपारिक खेळही हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसून येत आहे.
हरवत चाललेलं बालपण आणि दुनियादारीशी सामना करत स्पर्धेत धावताना प्रत्येक जण चांगले आरोग्य आणि खऱ्या आनंदापासून वंचित राहतोय का असा प्रश्न सगळीकडे उपस्थित होत असताना दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. आ. अभय पाटील यांनी टिळकवाडी येथील लेले मैदानावर पारंपारिक जुन्या खेळांचा महोत्सव भरविला
या महोत्सवात विटी-दांडू, टायर पळविणे, कबड्डी, गोट्या यासह आगळे खेळ रंगले. याला अनेक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि मध्यमवयीन नागरिकांपासून ज्येष्ठ सदस्यांपर्यंत सारेजण या खेळात रमले.
या खेळांचा आनंद घेताना अनेकांना आपल्या बालपणातील क्रीडाप्रकारांना पुन्हा एकदा अनुभवता आले. या क्रीडा महोत्सवावेळी आ. अभय पाटील यांच्यासह सध्या अधिवेशनासाठी बेळगावात दाखल झालेले आ. विश्वनाथ, शेखर गुळीहट्टी, सिद्धू सवदी आणि इतरांनी सहभाग घेतला होता.
आ. विश्वनाथ, शेखर गुळीहट्टी, व सिद्धू सवदी म्हणले की बेळगावचा विकास पाहून आनंद होतो.त्यांनी भरभरून आ.अभय पाटील आणि त्यांचे आगळावेगळा विचार सर्णीचा कौतुक केले.