श्री सरस्वती वाचनालयाच्या वतीने रविवारी स्वरांजली भावगीत मैफल
बेळगांव/
श्री सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच विभागातर्फे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांचा बहारदार मराठी भावगीतांचा “स्वरांजली” सुगमसंगीत कार्यक्रम रविवार दि. 9 रोजी सायंकाळी 5.30 वा. वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहात होणार आहे. त्यांना सिंथेसायझरवर सुनील गुरव (कोल्हापूर), ऑक्टो पॅडवर स्नेहल जाधव व तबल्यावर संतोष पुरी साथसंगत करणार आहेत.
कलाकारांचा परिचय –
विनायक मोरे हे संगीत विद्वान पं. नंदन हेर्लेकर यांचे पट्टशिष्य असून विविध शिक्षण संस्थांमधून संगीत अध्यापन करतात. 2001 साली त्यांनी स्वरांजली संगीत संस्थेची सुरूवात करून त्याअंतर्गत अनेक संगीत उपक्रम राबविले. अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. एकाचवेळी हजारों विद्यार्थांना समूहगायन शिकविण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन दशेत त्यांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, मिरज, जयसिंगपूर, देवगड, गोवा, उजैन, भुवनेश्वर, बेंगळूर, मैसूर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणच्या अनेक नामवंत स्पर्धांमधून असंख्य पारितोषिके मिळविली आहेत.
विशेष म्हणजे 2006 मध्ये त्यांनी बेळगावमधील विविध 28 शाळांच्या 10,000 विद्यार्थांना एकत्रित करून त्यांच्या समूहगायनाचा ‘सूरमयी भारत’ कार्यक्रम युनियन जिमखान्याच्या मैदानावर केला. 2016 साली 15,000 विद्यार्थ्यांचा देशभक्ती समूहगायनाचा कार्यक्रम करून त्यांनी जागतिक विश्वविक्रम नोंदविला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात 1,000 विद्यार्थ्यांचे संपूर्ण वंदे मातरम् तसेच विश्व कन्नड संमेलनात 1,000 विद्यार्थ्यांचे समूहगायन त्यांनी प्रस्तुत केले. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मतिमंद, अंध, अंगविकलांग, एचआयव्हीग्रस्त यांना त्यांनी विविध स्फूर्तीगीते शिकवून त्यांना एकाच व्यासपीठावर आणले व त्यांच्या समूहगायनाचा विशेष कार्यक्रम केला. हिंडलगा कारागृहातील कैद्यानांही त्यांनी संगीताचे धडे दिले आहेत. शहरातील सर्व बी. एड्. महाविद्यालयांमधून ‘शाळेत संगीत विषय कसा शिकवावा’ याबाबत त्यांनी दरवर्षी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. अनेक संघ-संस्थांनी त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानामुळे विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. भारत विकास परिषद बेळगांव शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
अक्षता मोरे – यांनी आपले वडील श्रीनिवास नायक यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतले. गोवास्थित काका पं. रामराव नायक यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. विनायक मोरे यांच्या त्या पत्नी असून त्यांच्याकडून संगीताचे मार्गदर्शन घेत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी आपले गायन प्रस्तुत केले आहे. त्या एम्. ए. बी. एड्. असून इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. स्वरांजली संगीत संस्थेच्या त्या संचालिका आहेत.
रविवारी होणाऱ्या स्वरांजली कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोत्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार व कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी केले आहे.