रामतीर्थ नगर रहिवाशाचे सोयीसुविधा त्वरेने उपलब्ध करून देण्याबाबत बुडा समोर आंदोलन.
बेळगाव:
रामतीर्थनगर येथे प्रलंबित नागरी सोयीसुविधा त्वरेने उपलब्ध करून देऊन बुडाने ही वसाहत बेळगाव महापालिकेकडे सुपूर्द करावी, अशी मागणी रामतीर्थनगर येथील रहिवाशी आणि विविध संघटनांतर्फे एका निवेदनाद्वारे आमदार आसिफ सेठ आणि बुडा अध्यक्षांकडे केली आहे.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) अखत्यारित असलेली रामतीर्थनगर ही वसाहत 27 वर्षांपूर्वीची असूनही अद्याप या वसाहतीचा म्हणावा तसा विकास करण्यात आलेला नाही. खरे तर नियमानुसार ही वसाहत अस्तित्वात आल्यानंतर 5 वर्षात त्या ठिकाणी आवश्यक सर्व त्या नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन रामतीर्थनगर वसाहत बेळगाव महापालिकेकडे सुपूर्द करावयास हवी होती.
मात्र आता दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला तरी त्याची पूर्तता झालेली नाही. आतापर्यंत येथील रस्ते व गटारी निकृष्ट बनले असून येथील विकास झालेला नाही. उद्यानाचे काम बाकी आहे. येथील भूमिगत गटारी आणि भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला तर अजून हातही लावण्यात आलेला नाही.तेंव्हा यापुढे बुडाला उपलब्ध होणारा निधी अन्य कामांसाठी न वापरता प्रथम रामतीर्थनगर येथील सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच त्यानंतर ही वसाहत महापालिकेकडे हस्तांतरित केली जावी अशा आशयाचा तपशील रामतीर्थनगर वासियांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
रामतीर्थनगर येथील रहिवाशी आणि विविध संघटनांतर्फे निदर्शने करून मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी बुडा अध्यक्ष आणि आमदार असिफ सेठ यांना सादर करण्यात आले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बुडाच्या संचालकाना म्हणाले पिण्याचे पाणी, स्वच्छता, गटारी अशा प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना आंदोलन करावी लागत आहेत ही सध्या बुडाची परिस्थिती असल्याचे खेदाने सांगितले.
नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत जाब विचारल्यास आमच्याकडे पुरेसा निधी नाही, कायमस्वरूपी कामगार नाहीत वगैरे कारणे सांगून बुडा कडून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात आहे.
तथापि आता रामतीर्थनगर येथील रहिवाशी आणि विविध संघटनांनी केलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मी स्वतः जातीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले याप्रसंगी रामतीर्थनगर येथील रहिवाशी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत जिल्हा पालकमंत्री यांना देखील पाठवण्यात आली आहे.