समृद्धी पाटील हिला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुढाकाराने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारा आयोजित 41 व्या राष्ट्रीय ज्युनियर क्योरुगी तायक्वांदो चॅम्पियनशिप -2024 मध्ये गोव्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मूळच्या बेळगावच्या समृद्धी शिवाजी पाटील हिने रौप्य पदक पटकावले आहे.
सदर राष्ट्रीय स्तरावरील क्योरुगी तायक्वांदो चॅम्पियनशिप गेल्या 18 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. ज्यामध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समृद्धी पाटील हिने महिलांच्या कनिष्ठ 52 किलो खालील वजनी गटात उपविजेते पदासह रौप्य पदक मिळविले. या स्पर्धेसाठी तिला गोव्याचे दोन ज्येष्ठ तायक्वांदो प्रशिक्षक सुनील शर्मा आणि थिओफाइल लोवे यांचे मार्गदर्शन लाभले. समृद्धी ही मूळचे चन्नेवाडी (ता खानापूर) आणि सध्या फोंडा गोवा येथील रहिवासी नामवंत कबड्डीपटू शिवाजी पाटील यांची कन्या आहे. उपरोक्त राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.