मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 100 हून अधिक जण अडकल्याची भीती.
मुंबई :
मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच वडाळामध्ये सुद्धा पार्किंग टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन मोठ्या दुर्घटनांसह मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अवघ्या तासाभरामध्ये मुंबईत हाहाकार झाला. मुंबई महापालिकेकडून 40 बाय 40 स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अॅडव्हर्टायझिंग कंपनीला होर्डिंग्ज लावताना वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सुद्धा दाखल करण्यात आला होता.