भाजप ही भारतातील नवीन ईस्ट इंडिया कंपनी : रणदीप सिंग सुरजेवाला
बेळगाव :
बेळगावात आलेले काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून टीका करत देशातील वसाहतशाहीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने वापरलेले तंत्र भाजप वापरत असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जातीच्या आधारावर समाजात फूट पाडत आहेत, असा आरोप केला.
शहरातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रातील भाजप सरकार कन्नड विरोधी असून जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे असा आरोप करून कर्नाटकातील दुष्काळाच्या समस्येचा मुद्दा उचलून धरत सुरजेवाला यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकाराने राज्यात दुष्काळाची घोषणा न करता राष्ट्रीय आपत्ती । निवारण निधीमधून (एनडीआरएफ) मिळणारा निधीही रोखून धरला आहे, अशी टीका केली.
भाजप सरकार एकूण 58 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास विलंब करत आहे असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रमुख सदस्य सतीश जारकीहोळी, राजू सेठ आणि लक्ष्मण सवदी यांच्या समवेत सुरजेवाला यांनी रिकामी चंबू दाखवून मोदी सरकारचे अपयश सुचित केले. तसेच गो बॅक मोदी, अमित शाह गो बॅक अशा घोषणा देऊन जनतेच्या भावना व्यक्त करत रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.