मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला आढावा
बेळगाव :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या मतदान अधिकारी व सहाय्यक मतदान अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कोणताही गोंधळ न होता सक्षमपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली.
आज बुधवार (दि.१० एप्रिल रोजी) वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि सहाय्यक मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. मतदान अधिकारी आणि सहायक मतदान अधिकाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कालावधीत काही गोंधळ असल्यास प्रशिक्षकांकडून माहिती घ्यावी. प्रशिक्षणासंबंधी संपूर्ण सचित्र माहिती असलेले एक इ-प्रत आणि पुस्तिका दिले जाईल,असे ते म्हणाले.
मॉक व्होटिंगनंतर स्लिप काढून टाकणे बंधनकारक आहे. मात्र स्लिप न काढल्यास मतमोजणीवेळी गोंधळ उडेल. त्यामुळे मॉक व्होटिंगनंतर नियमानुसार ईव्हीएममधील डाटा नाहीसा करणे आवश्यक असून त्यावर मतदान केंद्र अधिकारी व एजंट यांच्या सह्या घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मतदानाच्या दिवशी अनिवार्यपणे मतदान करावे. प्रशिक्षणादरम्यानच विहित पोस्टल मतदान अर्ज भरावेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वतः जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराबाबत प्रात्यक्षिक दिले. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट एकत्र करताना काळजी घ्यावी. तसेच प्रशिक्षणादरम्यान काही संभ्रम असल्यास त्याचे निराकरण करावे, असे सांगितले. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी शकील अहमद, तहसीलदार सिद्धराय भोसगी आदी उपस्थित होते.
यावेळी बी. के. मॉडेल स्कूलमध्ये आयोजित बेळगाव उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि सहायक मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचीही त्यांनी पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी पी.एन. लोकेश आदि उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मस्टरिंग आणि डिमस्टरिंग केंद्र असलेल्या बीके मॉडेल स्कूलमधील स्ट्रॉग रूमची पाहणी केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सतत कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. सहाय्यक निवडणूक अधिकारी पी.एन. लोकेश आदी उपस्थित होते.