हलगा – मच्छे बायपास कामाला पुन्हा स्थगिती..
बेळगाव :
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले असले तरी याप्रकरणी आज गुरुवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने सदर रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावून प्राधिकरणाला पुन्हा चपराक दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याची असलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. या संदर्भात आज गुरुवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या चतुर्थ न्यायालयात सुनावणी झाली. गेल्या 2022 मध्ये खालच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आजच्या सुनावणीत आव्हान देण्यात आले होते. त्या वेळेचा तो आदेश अर्धवट सुस्पष्ट नसल्यामुळे आजच्या सुनावणी त्यावर जवळपास दीड तास युक्तिवाद झाला. पोस्टाने रीतसर नोटीस बजावण्यात आल्यामुळे मागील वेळी सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या विरोधी पक्षाच्या वकिलांना आज नाईलाजाने सुनावणीला हजर राहावे लागले. आजच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामास स्थगिती दिली असून त्या संदर्भातील आदेश राखून ठेवला आहे.
आजच्या न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकऱ्यांचे वकील अॅड. रविकुमार गोकाककर म्हणाले की, हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी यापूर्वी तीन वेळा न्यायालयात धाव घेतली होती. या तीनही वेळेला उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.