विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी दोघा मित्रांना अटक
निपाणी :
निपाणी संभाजीनगर येथील विद्यार्थी साकीब समीर पठाण या १४ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणाचा तपास १२ तासात लावण्यात निपाणी पोलीसाना यश आले. मित्रांनीच साकीबचा खून केला असून खुनाचे नेमके प्रकरण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मोबाईलवर बोलण्यातून भांडण होवून भांडणाचे खुनात पर्यावसन झाल्याची चर्चा आहे. या खून प्रकरणी एका अल्पवयीन मित्रासह त्याचा साथीदार जुबेर सलीम एक्सबे (वय २१ रा. संभाजी नगर, निपाणी) या दोन संशयीतांना ताब्यात घेऊन बेळगावच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले.
जूने संभाजीनगर येथील साकीब पठाण हा गुरूवारी रात्री घरातून बाहेर पडला. दरम्यान, तो बराच उशीर घराकडे परतला नाही. त्यामुळे त्याचा घरच्यांनी इतरत्र शोध चालविला होता. शुक्रवारी सकाळी साकीब याचा बाळूमामानगर येथील रहिवासी चोपडे यांच्या नवीन घरातील पुढील खोलीत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. घटनास्थळी साकीबच्या आई- वडीलासह डीवायएसपी जी. बी. गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षिका उमादेवी गौडा यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत खून झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटविली.
परिसरातील मोबाईल लोकेशन या आधारे पोलिसांनी तात्काळ त्याच्या ५ संशयित मित्रांना ताब्यात घेतले. साकीबचे घरातील वागणे, मित्राबरोबर असणारे संबंध यांची कसून चौकशी केली. यावेळी संशयित जुबेर याने आपल्या अल्पवयीन मित्राने आपला मोबाईल कांहीकाळ साकीब याला हाताळण्यासाठी दिला होता. साकीबने मोबाईल हाताळल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढत गेल्याने साकीबच्या डोक्यात अल्पवयीन मित्राने पेव्हर ब्लॉकचा जोरदार फटका दिला. यामध्ये साकीब गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला. यावेळी संशयीत दोघांनी तेथून पळ काढला. त्यानुसार संशयीत दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद करून दोघा संशयितांना बेळगावच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, एकाची हिंडलगा कारागृहात तर, अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती पोलीसांनी दिली.
याप्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिका-यांसह हवालदार शेखर असोदे, सुदर्शन अस्की, यासीन कलावंत, एम. ए. तेरदाळ, उमेश माळगे, सलीम मुल्ला, पी. एम. घस्ती, मंजुनाथ कल्याणी यांनी केला.