117 वर्षांच्या पायोनियर बँकेला एक कोटी 55 लाखाचा निव्वळ नफा .
बेळगाव:
117 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे” अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बँकेच्या मठ गल्ली येथी मुख्य कार्यालयात संपन्न होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना माहिती देत होते. बँकेच्या इतिहासात प्रथमच एवढा नफा झाला असून बँकेकडे 127 कोटी 47 लाखाच्या ठेवी ही आहेत. तर बँकेने 94 कोटी 16 लाखाची कर्जे वितरित केली आहेत.
बँकेचे भाग भांडवल 2 कोटी 43 लाख रुपयांचे असून राखीव निधी 18 कोटी 67 लाख झाला आहे. बँकेने 47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून 152 कोटीचे खेळते भांडवल आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने 222 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला असून बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस आणि मार्केट यार्ड अशा एकंदर चार शाखा कार्यरत आहेत. बँकेची निव्वळ आणि अनुत्पादित कर्जे शून्य टक्के असून एनपीएचे प्रमाणही ०% आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो असेही श्री अष्टेकर म्हणाले. गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवीमध्ये सुमारे 22 कोटी रुपयांची वाढ झाली असून कर्जामध्ये सुद्धा 18 कोटी रुपये वाढ झाली आहे.