विवेकानंद सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
– सोसायटीला 7 लाख 74 हजार 956 रु. निव्वळ नफा
बेळगाव, ता. 14 :
कॉलेज रोड, बेळगाव येथील विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को- ऑप. सोसायटीने अहवाल वर्षात 40.85 कोटी रुपयांची उलाढाल करून 31 मार्च 2023 अखेर एकूण 7 लाख 74 हजार 956 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. सोसायटीकडे एकूण भाग भांडवल 18 लाख 28 हजार 400 रुपये असून 825 भागधारक आहेत. सोसायटीने 14 कोटी 30 लाख 58 हजार 424 रु. कर्ज वाटप केले आहे. भागधारकांना यंदा 12% लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.
विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार ता. 12 रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी, अधिक नफा मिळविणे आमचे उद्दिष्ट नसून समाजातील दुर्बळ व दुर्लक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त उपयोगी पडणे हे ध्येय असल्याचे यावेळी कुमार पाटील यांनी सांगितले.
सचिव पद्मा बाडकर यांनी मागील वर्षाचे अहवाल वाचन केले. संचालिका निता कुलकर्णी यांनी नफा – तोटा पत्रकाचे वाचन केले. संचालक संकेत कुलकर्णी यांनी बैलेंस शीट वाचले, संचालक अरविंद कुलकर्णी यांनी नफा विभागणी आणि ऑडिट रिपोर्टचे वाचन केले. संचालक प्रशांत पाटील यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. घटनादुरुस्तीचे वाचन संचालक किरण धामणेकर यांनी केले. संचालिका पुजा पाटील आणि कॅशियर स्नेहल कुलकर्णी यांनी नियमावलींचे वाचन केले. यावेळी सभासद आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी कु. वैष्णवी नाडगौडा यांनी स्वागत गीत गायिले. सूत्रसंचालन अभिजीत देशपांडे यांनी केले. यावेळी सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालक अविनाश कुलकर्णी यांनी आभार मानले. सेक्रेटरी सविता गवस यांच्या अनुपस्थितीत अर्चना दरवंदर यांनी त्यांच्या मनोगताचे वाचन केले.