138 कामगारांची नियुक्ती रद्द : मनपा आयुक्तांचा निर्णय
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या 138 कामगारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी घेतला आहे.
बेळगाव महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सफाई ठेकेदारांच्या काल शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी उपरोक्त निर्णय घेतला. त्याचप्रमाणे बैठकीत कोणाच्या आदेशावरून या 138 कर्मचाऱ्यांची भरती केली? असा सवाल त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांना करून त्यांची झाडाझडती घेतली.
महापालिकेकडून कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या 138 पैकी 8 कामगार हे परराज्यातील असल्याची तक्रार झाली होती. त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा व तीन दिवसात अहवाल देण्याचा आदेश आयुक्त दुडगुंटी यांनी कलादगी यांना दिला होता. आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 16 ऑगस्ट नंतर त्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करून घेणे आवश्यक होते.
मात्र प्रत्यक्षात 1 जुलैपासून त्यांना नियुक्त करून घेतल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. त्यामुळेच त्यांनी काल झालेल्या महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाचे अधिकारी व सफाई ठेकेदारांच्या बैठकीत संबंधित 138 कंत्राटी कामगारांची भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे
महापालिकेतील 138 सफाई कामगारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय आयुक्त अशोक दूरगुंती यांनी घेतला असला तरी त्याबाबतचा लेखी आदेश काढण्याची गरज आहे.
सफाई ठेकेदारांना मुदतवाढ देताना जो आदेश बजावला होता त्यात 9 ठेकेदारांच्या माध्यमातून 138 कामगारांना नियुक्त केले होते. त्यामुळे सफाई ठेकेदारांना दिलेल्या आदेशात आता बदल करावा लागणार आहे.