आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीनं याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं नायडू यांच्यावर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल परिसरात दाखल झाला होता.

चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही.

टीडीपी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद अन् अखेर अटक चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्याच्या अटकेसाठी 51CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. अखेर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली.

चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि टीडीपी नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टीडीपीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकेशचा व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, ते (लोकेश) चंद्राबाबू नायडूंना भेटू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post वाघ नख’ च घरवापसी होत आहे.
Next post गणेश चतुर्थी: यशवंतपूर-बेळगावी दरम्यान विशेष रेल्वे सेवा – खासदार ईरन्ना कडाडी