जिल्हा पंचायत, तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना
बेळगाव :
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित केली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीची मतदार संघ संख्या ८८ वरून ९१ झाली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार संघांत कोणकोणत्या गावांचा समावेश असेल, ती यादीही जाहीर करण्यात आली आहे.
मतदार संघांची रचना करताना नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील एकूण जिल्हा आणि तालुका पंचायत मतदार संघांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील कालावधीच्या तुलनेत राज्यात एकूण जिल्हा पंचायतींचे २५ मतदार संघ वाढले आहेत. त्यात बेळगाव जिल्हा पंचायतीच्या तीन मतदार संघांचा समावेश आहे. याशिवाय राज्यभरात तालुका पंचायतींचे ३८७ मतदार संघ वाढवले आहेत.
जि.पं.चे २५ मतदार संघ वाढले जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या अखत्यारितील काही मतदार संघांतील गावांचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांत करण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार मतदार संघ निश्चित करण्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांतील मतदार संघांच्या संख्येत बदल झाला आहे. आयोगाच्या निर्णयानुसार राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या १११८ वर पोहोचली आहे. यापूर्वी ३० जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या १०९३ होती. प्रामुख्याने बंगळूर शहर जिल्हा पंचायतीमध्ये पूर्वी ५० मतदार संघ होते. आता २८ पर्यंत खाली आले आहेत. बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात २५ मतदार संघ होते, ते आता २१ झाले आहेत. दावणगिरी जिल्ह्यात ३६ मतदार संघ होते. ते आता २९ असे झाले आहेत. मात्र कारवारमध्ये जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या यापूर्वी ३९ इतकी होती. ती आता ५४ वर पोहोचली आहे. बळ्ळारी जिल्ह्यात ४० मतदारसंघ होते. जिल्ह्याचे बळ्ळारी आणि विजयनगर असे विभाजन झाले आहे. विभाजनानंतर बळ्ळारी आणि विजयनगर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २८ मतदार संघ आहेत.
जाहीर करण्यात आलेले मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आणि संख्या याबाबत आक्षेप करण्यास १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आक्षेप ऑनलाइन, स्वतः किंवा पोस्टाने दाखल करता येणार आहेत. मुदतीनंतर आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.
https/rdpr.karnataka.gov.in/rdc/public/ या संकेतस्थळावर ऑनलाइन हरकती दाखल करता येणार आहेत. स्वतः किंवा पोस्टाने आक्षेप दाखल करणाऱ्यांनी कर्नाटक पंचायत न्यायनिर्णय आयोग, तिसरा गेट, दुसरा मजला, खोली क्रमांक २२२/ए, आंबेडकर रोड, बंगळूर- ५६०००१ येथे हरकती सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.