खून प्रकरणातील मुख्य संशयित अखेर गजाआड
बेळगाव:
शिवबसवनगर येथे घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला निपाणी येथे गजाआड करण्यात माळमारुती पोलिसांना चार दिवसानंतर अखेर यश आले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नांव अक्षय उर्फ आकाश महादेव साळुंखे (वय 36) असे असून तो बुद्धनगर निपाणी येथील रहिवासी आहे. शिवबसवनगर येथे चार दिवसापूर्वी नागराज गाडीवड्डर या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी गेल्या शनिवारी प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय 20, रा. राजारामपुरी कोल्हापूर) आणि आकाश कडप्पा पवार (वय 21, रा. राजाराम चौक कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) यांच्या सहकार्याने माळ मारुती पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर फरारी असलेल्या मुख्य संशयित आरोपीचा शोध सुरू होता. त्याच्या अटकेसाठी पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली माळ मारुती पोलिसांचे पथक चार दिवसांपासून निपाणी, मिरज, सांगली, सातारा परिसर पिंजून काढत होते.
अखेर गेल्या सोमवारी रात्री त्याला निपाणी येथे अटक करण्यात आली. प्रेयसीला भेटायला आलो असताना नागराजने मारहाण केल्यामुळे आपण त्याचा खून केला असल्याची कबुली मुख्य आरोपी अक्षय उर्फ आकाश साळुंखे याने दिली आहे.
बेळगाव सिविल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत हिंडलगा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीने लवकरच अधिक चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेतले जाणार आहे.